मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा आज होणार असून यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. विधानसभेची आचारसंहिता लागायला काही तास बाकी असतानाच महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली काढलेला आहे.
महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रसने आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. त्यानुसार भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
आज (15 ऑक्टोबर) दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहे. तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होतील. त्याआधी आज दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये 12 पैकी 7 आमदारांचा शपथविधी पार पडेल. विधीमंडाळत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत हा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे.
चित्रा वाघ यांच्यासह ‘या’ 7 आमदारांचा आज शपथविधी!
भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
तर, माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना संधी देण्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटाने घेतला आहे. त्याचबरोबर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात येत आहे. आज हे सातही आमदार शपथ घेतील.