मुक्ताईनगर । जळगावात जिल्ह्यात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. जबरी चोरी, घरफोडी, खुनाच्या घटना वाढतच असल्याचे दिसून येत असून गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच शिल्लक राहिलेला नसल्याचे दिसतेय. दरम्यान, आज सकाळी मुक्ताईनगर शहरापासून काही अंतरावर असलेल्या मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस रस्त्याच्या बाजूला एका तरूणाचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या तरूणाच्या शरीरावर तीक्ष्ण हत्यार तसेच दगड वा तत्सम वस्तूने वार केल्याचे दिसून येत आहे. रस्त्यापासून थोड्या अंतरावर हा मृतदेह आढळून आला. दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरिक्षक संदीप दुनगहू यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. या तरूणाची ओळख पटविण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. तर या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात नोंद घेण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनास्थळी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी यांनी भेट दिली असून लवकरात लवकर गुन्ह्याची उकल करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी सांगितले.