मुंबई : आज लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यांनतर चार जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून मात्र यातच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला.
नेतृत्वाच्या मुद्यावर शरद पवार गटाचे ५ ते ६ आमदार काँग्रेस पक्षाच्या मार्गावर असल्याची खळबळजनक माहिती सुनील तटकरे यांनी दिली. या आमदारांनी दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क सुरू केल्याची आपली खात्रीलायक माहिती असल्याचेही तटकरे यांनी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना सांगितले.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुती सर्वाधिक जागांवर विजय होणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटातील काही प्रमुख आमदारांचा गट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागत असून हे आमदार काँग्रेस पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचे तटकरे म्हणाले.
आजच्या बैठकीकडे लक्ष
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांची दिल्लीत शनिवारी बैठक होत आहे. शरद पवार गटातील आमदार काँग्रेस पक्षात घेण्यावरून ही बैठक असावी, असा कयासही राजकीय वर्तुळात लावला जात आहे. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार यांनी लहान पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होऊ शकतात, असे संकेत दिले होते. या वक्तव्याला त्यांच्या पक्षातील आमदारांच्या या कृतीची किनार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे















Discussion about this post