ग्वालियर । मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील एका विद्यार्थ्याला प्राप्तिकर खात्याने तब्बल 46 कोटी रुपयांची नोटीस पाठविली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून त्याचे कुटुंबिय पण हादरले आहेत. प्रमोद कुमार दंडोतिया असं या विद्यार्थ्यांचे नाव असून नकळतपण झालेल्या एका चुकीचा त्याला फटका बसला आहे.
नेमकं प्रकरण तरी काय?
प्रमोद कुमार दंडोतिया हा ग्वालियरचा रहिवाशी असून तो एसएलपी या महाविद्यालयात इंग्रजी भाषेतून पदव्युत्तर पदवी करत आहे. त्याला आयकर खाते आणि जीएसटी विभागाने 46 कोटींची नोटीस पाठवली. सुरुवातीला ही नोटीस त्याला कोणाचा तरी खोडसाळपणा वाटला. मित्राने गंमत केल्याचे वाटले. पण त्याने याविषयीची चौकशी केली असता, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
आयकर खात्याने प्रमोदला नोटीस बजावली. त्यात त्यांनी त्याच्या पॅनकार्डचा वापर करुन दिल्लीत एक तर मुंबईत दोन कंपन्या रजिस्टर करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. 2021 मध्ये हा कारनामा करण्यात आला. हे प्रकरण इतक्यावरच थांबलेले नाही. तर त्याच्या बँक खात्याचा पण वापर करण्यात आला आहे. प्रमोदला निदान बँक खात्याची तरी अपडेट माहिती असणे गरजेचे होते. पण त्याने त्याकडे केलेले दुर्लक्ष त्याच्या अंगलट आले.
शुल्क भरणेच जिकरीचे
जानेवारी 2021 ते 2024 या दरम्यान प्रमोदच्या बँक खात्यातून 46 कोटींचा व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमोदने दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाचे शुल्क भरणे पण त्याला अवघड आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या व्यवहाराची माहिती कळताच त्याचे डोळेच पांढरे झाले. त्याने आयकर खाते आणि जीएसटीकडे याविषयीचे म्हणणे मांडले. पण त्याचा काही परिणाम न झाल्याने त्याने पोलिसांत धाव घेतली. पॅनकार्डचा चुकीचा वापर करुन त्याला फसविण्यात आल्याची कैफियत त्याने पोलिसांपुढे वाचली.















Discussion about this post