जळगाव : शनिवारी जळगाव शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले होते. मात्र याच दरम्यान, जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळत असताना चेंडू नाल्यात गेल्याने तो काढायला गेलेला सचिन राहुल पवार (वय ६. रा. हरिविठ्ठलनगर, मूळ रा. कुसुंबा, ता. रावेर) हा मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार वाजता घडली. पोहणारे तरुण, पोलिस व अग्निशमन विभागाने रात्री उशिरापर्यंत शोध घेतला, मात्र तो कुठेही मिळून आला नाही.
यासंदर्भात माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी चार वाजता सचिन त्याची १० वर्षांची बहीण परिसरातील लहान मुलांसह लिंबू तोडायला गेले होते. त्याठिकाणी ते चेंडू खेळायला लागले. खेळताना चेंडू जवळच्या नाल्यात पडला.
तो घेण्यासाठी सचिन नाल्यात उतरला. मात्र, त्याच वेळी पाऊस आल्याने नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि तो वाहत्या पाण्यात वाहून गेला. यावेळी लहान मुलांनी आरडाओरडा केली असता नागरिकांनी धाव घेतली. कुटुंबीयदेखील धावत आले. नाल्यात उतरून शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. सायंकाळी अग्निशमन विभागाचे पथकही त्याठिकाणी दाखल झाले; पण कुठेही थांगपत्ता लागला नाही. रात्री उशिरापर्यंत पोलीस व अग्निशमन विभागाकडून त्याचा शोध सुरू होता. सचिनचे वडील राहुल किसन पवार (वय ३२) हे मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात.















Discussion about this post