मुंबई : देशासह राज्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक तरुण उच्चशिक्षण घेऊनही बेरोजगार आहेत. अशातच बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी सरकारकडून पाऊल उचलली जात आहे. यातच राज्यातील महायुती सरकार खासगी कंपन्यांमध्ये तरुण-तरुणींना नोकऱ्या देणार आहे. त्यासाठीचा पहिला राज्यस्तरीय मेळावा ९ आणि १० डिसेंबरला नागपुरात होईल. नंतर प्रत्येक जिल्ह्यात असे मेळावे होतील. नागपुरातील पहिल्या मेळाव्यात २०० कंपन्यांचे मेगास्टॅाल असतील.
कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी नऊ खासगी एजन्सींची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, लोकटीकेनंतर तो निर्णय रद्द करण्यात आला आणि प्रत्येक शासकीय विभाग आपल्या पातळीवर अशी भरती करतील अशी भूमिका राज्य सरकारने जाहीर केली होती.
नागपूरपासून सुरुवात; मुलाखतीनंतर तिथेच नोकरी
कोणत्या कंपनीत किती पदांसाठी भरती करायची आहे, त्यासाठीची शैक्षणिक योग्यता काय याची माहिती दिली जाईल. तरुण-तरुणींचा बायोडेटांची छाननी करून काहींना मुलाखतीनंतर तिथेच नोकऱ्या दिल्या जातील. काहींना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मार्गदर्शन केले जाईल. नागपूरच्या मेळाव्यासाठी इच्छुक तरुण-तरुणींची नोंदणी या आठवड्यात सुरू होणार आहे. या मेळाव्याच्या आयोजनासाठी सरकारने गुरुवारी पाच कोटी रुपये दिले.
दरम्यान, राज्य सरकारी सेवेत ७५ हजार पदांची भरती करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्याने सुरू आहे. आता खासगी कंपन्यांमधील नोकऱ्यांचे दालन सरकारच्या माध्यमातून खुले केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेऊन मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देण्यात सरकारला यश आले तर राजकीय फायदाही होईल.
Discussion about this post