मुंबई । जालना येथील मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला आहे. राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक झाला असताना दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकार आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राजकीय वर्तुळातून हालचाली सुरू झाल्या आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधा संदर्भात राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची आज महत्वाची बैठक होणार. या बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला मराठा आरक्षण मंत्री उपसमितीमधील सर्व सदस्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहे.
या बैठकीत मराठा समाजाच्या (Maratha Reservation) महसुली व शैक्षणिक नोंदी, निजाम काळात संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्तऐवज व इतर कागदपत्रे, मराठा समाजातील लोकांची वंशावळ हे या समितीच्या बैठकीतले प्रमुख मुद्दे चर्चेले जाणार आहेत.
Discussion about this post