पंढरपूर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अन्यथा गावात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा संघटनांनी राजकीय नेत्यांना दिला आहे. यातच मराठा आरक्षणासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर आता माढा तालुक्यातील रांझणी भिमानगर ग्रामपंचायत सरपंच चंचला विजय पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे.
माढा तालुक्यातील रांझणी भिमानगर ग्रामपंचायत सरपंच चंचला विजय पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे . मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. रांझणी भिमानगर येथे साखळी उपोषणाला सुरूवात झाली असून शिवकन्या प्राची सुरेश जाधव व मेजर संजय गोटणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहून सरपंच प्रतिनिधी गणेश पाटील यांनी ही घोषणा केली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील महिला सरपंच पदाचा राजीनाम चंचला पाटील यांनी दिला असल्याने आरक्षणाची धग आता अधिकच तीव्र झाली आहे.