जळगांव – एस.डी. फाऊंडेशन संचलित मानिनी महिला संघाची पहिली बैठक रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्था, जुने एम्प्लॉयमेंट ऑफिसजवळ, जळगाव येथे होणार आहे. या उपक्रमास जनबंधू प्रतिष्ठान जळगाव, नाट्यरंग जळगाव, खान्देश नाट्य प्रतिष्ठान जळगाव या सहयोगी संस्था असून महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्ह्याचे विशेष सहकार्य लाभले आहे.
मुली व महिलांचा सर्वांगीण विकास साधणे, त्यांना शिक्षण, रोजगार, व्यवसाय, नोकरी, स्वावलंबन, स्वसंरक्षण, आरोग्य, विधी समुपदेशन, नाट्य, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात आवश्यक मदत उपलब्ध करून देणे हा मानिनी महिला संघाचा मुख्य उद्देश आहे. ही बैठक या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीचे पहिले पाऊल ठरणार आहे.
या बैठकीत समुपदेशन व मार्गदर्शनासाठी भारती कुमावत, सोनाली महाजन, रेणुका चव्हाण, रोहिणी विसपुते, भाग्यश्री दुसाने सहभागी होणार आहेत. प्रारंभीच अनेक महिलांना पार्टटाईम व फुलटाईम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात यश मिळाल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमापूर्वी ‘गाईड’ या बसल्याजागी पंढरपूर दर्शन घडविणाऱ्या लोकप्रिय एकांकिकेचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. यासोबतच शॉवलीन कुंग-फू इंटरनॅशनलचे प्रशिक्षक विजय सोलंकी यांच्याकडून स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. दर महिन्याच्या बैठकीत एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, अभिवाचन, नाट्यछटा यांसारखे सांस्कृतिक प्रयोग सादर करण्याचा मानस संघटनेने व्यक्त केला आहे.
कार्यक्रमानंतर अल्पोपहार व चहाची व्यवस्था करण्यात आली असून हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.















Discussion about this post