मुंबई । महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागा वाटपासंदर्भात मॅरेथॉन बैठकांचे सत्र सुरु असून त्यापूर्वी काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आलीय.
बुधवारी काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक पार पडली. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली असून २० तारखेला पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली.
या बैठकीमध्ये राज्यातील जवळपास ८४ जागांवर चर्चा झाली त्यापैकी ६२ जागांवर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. आता २० ऑक्टोबर रोजी रविवारी होणाऱ्या दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये जागांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार असून काँग्रेसची पहिली यादीही २० ऑक्टोबरला जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे, राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 50 मतदारसंघात एकच नाव आल्यानं उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील विदर्भातील नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, यशोमती ठाकुर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. याबाबत 20 ऑक्टोबरला काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुण्यात शहर काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गटातटाच्या राजकारणाऐवजी आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करावा, अशा सूचना काँग्रेस पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पुढील महिनाभर मतभेद विसरून कामाला लागा, महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेन त्याचा घरोघरी जाऊन प्रचार करा, अशा सूचना यावेळी काँग्रेस नेते, तसेच पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.















Discussion about this post