जळगाव । धरणगाव तालुक्यात व्यापाऱ्याला अडवून दीड कोटी रुपयांची लूट केल्याची घटना घडली होती. दरम्यान, या लुटीप्रकरणातील दोघांच्या जळगाव एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी (३२, रा. विदगाव, ता. यावल) व दर्शन भगवान सोनवणे (२९, रा. विदगाव, ता. यावल) यांना अटक केली. त्यांच्याकडून ४८ लाख रोख, २ तलवार, १ गुप्ती, २ चाकू हस्तगत केले असून चौघे अद्याप फरार आहेत. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २२ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावणावल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धरणगाव तालुक्यातील भोद खुर्द शिवारात अनिल अग्रवाल व दुर्गेश अग्रवाल यांच्या मालकीच्या दुर्गेश इम्पेक्स जिनिंगचे कर्मचारी जळगावहून पैसे घेऊन कारने जात असताना शनिवार, १७ रोजी दुपारी धरणगाव बायपासजवळ चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून एक कोटी ६० लाख रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले होते.यामुळे खळबळ उडाली होती.
यातील मुख्य संशयित अनिल उर्फ बंडा कोळी याने हा दरोडा टाकल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी चार पथके तयार करुन संशयितांच्या मागावर रवाना केले होते. या पथकाने शहरातून अनिल उर्फ बंडा कोळी व त्याचा साथीदार दर्शन सोनवणे या दोघांच्या मुसक्या आवळल्या, त्यांना धरणगाव न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. २२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, मुख्य संशयित अनिल उर्फ बंडा कोळी याने दीड वर्षापूर्वी शहरातील एका प्रसिद्ध उद्योजकाच्या घरावर दरोडा टाकला होता. याच गुन्ह्यात तो जिल्हा कारागृहात असतांना त्याची ओळख घरफोडीमधील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारासोबत झाली, त्याला भेटण्यासाठी उल्हासनगर येथून त्याचे नातेवाईक कारागृहात भेटायला येत होते. दरम्यान, अनिल उर्फ बंड यांच्यासोबत देखील त्यांची जवळीक वाढली, बंडा हा जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने उल्हास नगर येथील दरोडा टाकणाऱ्या टोळीशी संपर्क साधून प्लॅन तयार करीत भरदिवसा दरोडा टाकला.
गोठ्यात लपवून ठेवलेली रोकड हस्तगत !
भरदिवसा व्यापाऱ्याला लुटल्यानंतर दरोडेखोरांनी लुटलेल्या पैशांचे सहा हिस्से करुन ते आपापसात वाटून घेतले. त्यानंतर उल्हास नगर येथील दरोडा टाकणारी टोळी तेथून पसार झाली, तर अनिल उर्फ बंडा व त्याचा साथीदार दुर्गेश सोनवणे हे त्यांच्या गावी निघून गेले. लुटलेल्यानंतर मिळालेली सुमारे ४८ लाखांची रोकड अनिल उर्फ बंडा याने दुर्गेश सोनवणे यांनी डांभुर्णी येथील त्यांच्या नातेवाईकांकडे ठेवलेली होती. त्यांच्या घराजवळील गोठ्यातू पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ४८ लाखांची रोकड हस्तगत केली आहे.