जळगाव : “चप्पल आणायला जातो” असे सांगून घराबाहेर पडलेला आणि तब्बल पाच दिवसांपासून बेपत्ता असलेला २९ वर्षीय तरुणाचा कुजलेला मृतदेह नशिराबाद शिवारातील विमानतळाच्या मागे असलेल्या शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव रामू हशा वास्कले (वय २९, रा. नांदिया, ता. भगवानपूर, जि. खरगौन, म.प्र., ह.मु. कुसुंबा, ता. जळगाव) असे आहे. तो कुसुंबा येथे पत्नी व चार मुलांसह वास्तव्यास होता आणि एका शेतकऱ्याच्या शेतात सालदार म्हणून काम करत होता.
२६ जुलै रोजी रामूने पत्नीला “चप्पल आणायला जातो” असे सांगून घर सोडले, परंतु रात्रीपर्यंत परतला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.
३१ जुलै रोजी नशिराबाद शिवारातील आत्माराम राजाराम पाटील यांच्या शेताच्या बांधावर एक कुजलेला मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर नशिराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची ओळख रामू वास्कले म्हणून पटली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. घटनेचा तपास सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. रामूच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.
Discussion about this post