मुंबई । अन्न पदार्थातील भेसळ ही गंभीर बाब असल्यामुळे विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यवर गंभीर दुष्परिणाम होतो. कर्करोगासारखा दुर्धर आजार अनेकांना होतो. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात दुध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ करणाऱ्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
दुधातील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. राज्यातील दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवावी. अशी भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दुधातील भेसळीचा दुध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतो. नागरिकांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होतात. हे चिंताजनक आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठीच अन्न व औषध प्रशासन विभाग आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी गृह विभागाचे सहकार्य घ्यावे. भेसळीविरोधात राज्याचा स्वतंत्र कायदा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाने कार्यवाही करावी असे निर्देशही त्यांनी दिले.















Discussion about this post