नवी दिल्ली । खातेधारक आणि व्यावसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या धनादेश वटण्यासाठी लागणारा दोन दिवसांचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, नव्या प्रणालीअंतर्गत बँका धनादेश काही तासांतच वटवून संबंधित रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा करतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने चेक ट्रंकेशन सिस्टम ही नवी सुविधा 4 ऑक्टोबरपासून सुरू करणार आहे.
सध्या बँकिंग क्षेत्रात ‘चेक ट्रंकेशन सिस्टम’ (सीटीएस) ही प्रणाली वापरात असून, तिच्यामार्फत धनादेश वटण्यासाठी साधारण दोन कामकाजाचे दिवस लागतात. मात्र, व्यवहार प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि बँक ग्राहकांची सेटलमेंटसंबंधीची जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने, रिझर्व्ह बँकेने विद्यमान सीटीएस प्रणालीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ‘सेटलमेंट ऑन रियलायझेशन’ म्हणजेच आधी वसुली आणि नंतर पूर्तता, तसेच सतत चालणारी धनादेश वटणावळ या पद्धतीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
निरंतर वटणावळ आणि ‘वसुलीनंतर पूर्तता’ या सुधारित पद्धतीची अंमलबजावणी दोन टप्प्यांत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिला टप्पा 4 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल, तर दुसरा टप्पा 3 जानेवारी 2026 पासून लागू होईल, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. सर्वसाधारणपणे, बँकांचे नियमित कामकाज सुरू असताना म्हणजे सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत धनादेश सादर करणे आणि सतत वटणावळ प्रक्रिया सुरू राहील. या कालावधीत बँकांच्या शाखांमध्ये प्राप्त झालेले धनादेश स्कॅन करून त्वरित आणि अखंडपणे संबंधित ‘क्लिअरिंग हाऊस’कडे पाठविले जातील.
प्रत्येक सादर झालेल्या धनादेशाबाबत प्रदात्या बँकेने (ड्रॉई बँक) त्या धनादेशाची सकारात्मक किंवा नकारात्मक खात्री देणे आवश्यक राहील. हे पुष्टीकरण पूर्ण झाल्यानंतर मंजूर धनादेशाची रक्कम सायंकाळी 7 वाजेपर्यंत संबंधित खातेदाराच्या खात्यात जमा केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात, म्हणजेच 2 जानेवारी 2026 पासून, ड्रॉई बँकेसाठी पुष्टी देण्याचा कालावधी कमी करून तीन तासांचा करण्यात येईल. उदाहरणार्थ, सकाळी 10 ते 11 या वेळेत आलेल्या धनादेशांची पुष्टी दुपारी 2 वाजेपर्यंत देणे बंधनकारक असेल. जर त्या वेळेत बँकेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तर तो धनादेश स्वयंपूर्ण मंजूर समजला जाईल आणि दुपारी 2 वाजता पूर्ततेसाठी प्रक्रियेत समाविष्ट होईल.















Discussion about this post