रायबाग मधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने आधी दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्यानंतर कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. एकनाथ भीमाप्पा पडतारी (वय २२), मल्लिकार्जुन रामाप्पा मरेठे (वय १६), आकाश रामाप्पा मरेठे (वय १४), लक्ष्मी रामाप्पा मरेठे (वय १९), नागाप्पा लक्ष्मण यादवन्नावर (वय ४८), हनमंत मल्लाप्पा मल्यागोळ (वय ४२) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत तर बाळानंद परसाप्पा माळगी (वय ३७) असे जखमीचे नाव आहे.
ही घटना जत-जांबोटी राज्य महामार्गावरील मुगळखोडजवळ (ता. रायबाग) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार गुर्लापूरहून मुगळखोडच्या दिशेने येत होती. जत-जांबोटी मार्गावरील कार आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
यावेळी कारने समोरून जात असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता, की दुचाकींसह कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती स्थानिकांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहे.
Discussion about this post