मुंबई । एकीकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये जागांसाठी लढत सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या एका उमेदवारामुळे पक्षात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे उमेदवार किशनचंद तनवाणी पक्षाला तिकीट परत केले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या पक्षाला जोरदार धक्का बसला आहे.
या मतदारसंघातून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून प्रदीप जैस्वाल यांना तिकीट मिळाले आहे. तर उद्धव ठाकरेंनी किशनचंद तनवाणींना उमेदवारी दिली होती. मात्र, आता तनवाणी यांनी माघार जाहीर केली आहे. ठाकरेंच्या पक्षामध्ये अंतर्गत गटबाजीमुळे तनवाणी यांनी हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, तनवाणींच्या या निर्णयानंतर पक्षाकडून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. पक्षाने त्यांना जिल्हाप्रमुख पदावरुन मुक्त केले.तर तनवाणींनी माघार घेतल्यानंतर मध्य शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांची मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून अंबादास दानवे यांनी घोषणा केली.
तनवाणी यांनी माघारी घेतल्याचं कारण काय?
”मला निवडून येण्यासाठी लढायचं होतं, कार्यकर्त्यांचे मेळावे लावा म्हणून सांगत होतो, पण कुणीही ऐकत नव्हतं. मग मी म्हणालो लढायचं असेल तर काम करावं लागेल, पण आमचीच मोट बांधलेली नव्हती. मला जर गद्दरी करायची असती तर फॉर्म भरून माघार घेतली असती. मी कुणाच्या दबावात येत नाही.” अशी प्रतिक्रिया किशनचंद तनवाणी यांनी दिली.
”पक्षातील गटबाजीमुळे माझी लढायची इच्छाच नाही. अंबादास दानवे गटबाजी करीत आहेत.. नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी कुठेही जाणार नाही.” असंही तनवाणी म्हणाले.