अपघाताची एक भयंकर घटना मध्य प्रदेशच्या इंदूरमधून समोर आलीय. ज्यात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ५० जणांना घेऊन जाणारी बस थेट दरीत कोसळली. या अपघातामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये ३८ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकारेश्वरवरून उज्जैनच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बसला अपघात झाला. रात्री पावणे दहाच्या सुमारास इंदूरमार्गे ही बस जात होती. त्याचेवळी भेरू घाटात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस ५० फूट खोल दरीत कोसळली. अपघातावेळी बसमध्ये ५० प्रवासी होते. या अपघातामध्ये तिघांनी जागीच प्राण सोडले तर ३८ पेक्षा अधिक जण जखमी झाले. हा अपघात झाला त्यावेळी जोरदार किंचाळ्यांचा आवाज झाला. बस दरीत कोसळताना बसमधील प्रवासी प्रचंड घाबरले.
घटनेची माहिती मिळताच सिमरोल पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना तात्काळ बसमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात उपचारासाठी हलवले. जखमींवर इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, भेरू घाटात वळणावर बस चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली.
पोलिसांनी सांगितले की, बसमध्ये ओंकारेश्वरवरून परतणारे प्रवासी होते. काही प्रवासी दिल्ली तर काही इतर शहरांमधून होते. या अपघातामध्ये पद्माबाई (४५ वर्षे, राहणार – इंदूर), राहुल( २५ वर्षे, राहणार – उत्तर प्रदेश) आणि अनिता (४० वर्षे, राहणार- इंदूर) या तिघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिस आणि प्रशासनाने खिडकीच्या काचा तोडून बसमधून प्रवाशांना बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले.















Discussion about this post