एरंडोल । जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. याच दरम्यान,एरंडोल तालुक्यातील अंजनी नदीच्या पुरात हनुमंतखेडे बुद्रुक (ता. एरंडोल) येथील ६२ वर्षीय शेतकरी रविवारी वाहून गेला होता. शेतकरी नदीच्या पात्रात वाहून गेल्याचे समजल्यानंतर रात्रभर नदी पात्रात शोध घेतला. मात्र बारा तासानंतर त्यांचा मृतदेह गावाजवळच नदीच्या किनाऱ्यावर सापडला.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला होता. यामुळे अंजनी नदीला पूर आला होता. हणमंतखेडे बुद्रुक येथील राजेंद्र भगवान पाटील (वय ६२) हे सायंकाळी सातच्या सुमारास शेतातील कामे आटोपून घराकडे जात असताना अंजनी नदीच्या पुलावरून जात असताना त्यांचा पाय घसरल्याने ते पात्रात पडले. राजेंद्र पाटील हे नदीच्या पात्रात पडल्याचे समजताच ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा शोध लागला नाही.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी माहिती जाणून घेतली. अमोल पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. एसडीआरएफ पथक तातडीने कार्यरत करण्याचे आवाहन केले. दरम्यान, गावातील काही नागरिकांनी नदीच्या पात्रात राजेंद्र पाटील यांचा शोध घेतला. मात्र अंधार असल्यामुळे ते सापडू शकले नाही. सकाळी त्यांचा मृतदेह गावालगतच नदीच्या पत्रात सापडला. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
Discussion about this post