जळगाव\मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील हवामानात बदल दिसून येत आहे. एकीकडे कडाक्याची थंडी पडली असताना अचानक राज्यातील काही ठिकाणी पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे पारा आणखी घसरला असून थंडीचा कडाका कायम आहे, पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातही थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविला आहे. दरम्यान काल जळगावात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.
उत्तरेकडून थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून गारठा वाढणार आहे. उत्तरेकडून राज्यात शीत लहरी येत आहेत आणि पारा अधिकच खाली जाताना दिसत आहे. काही भागात अवकाळी पावसाचा इशाराही देण्यात आला.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शिवाय थंडीही वाढेल. जळगाव येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. जळगावात 9.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली त्यानंतर धुळात 9.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. दुसरीकडे जेऊर येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सतत हवामानात बदल आणि वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, गळ्यात दुखण्याच्या समस्या वाढल्या आहेत. वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने नागरिकांना मास्क घालून फिरण्याचा सल्ला दिला. हेच नाही तर ज्यांना श्वसनाचे आजार आहेत, अशांनी मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असेही म्हटले.















Discussion about this post