जळगाव/मुंबई । राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. मात्र आता उत्तर भारतात सध्या अतिशय दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही होताना दिसत आहे. हवामान विभागाने राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांत पारा २ ते ३ अंशाने घसरणार आहे.
कित्येक दिवसांपासून कमी झालेला गारठा नव्या वर्षाच्या स्वागताला पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. मंगळवारी परभणीत ६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळ्यात ६.६ अंश सेल्सिअस, निफाड येथे ६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अहिल्यानगर, जेऊर, गोंदिया, नागपूर, यवतमाळ येथे ९ अंश, तर पुणे, नाशिक, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली येथे १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. जळगाव शहराचे देखील तापमान घसरले असून मंगळवारी १० अंश इतके तापमान नोंदविण्यात आले.
पहाटेच्या वेळी धुके आणि दव पडल्याचे चित्र कायम आहे. आज राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहणार असून थंडी टिकून राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे उद्यापासून किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर जळगाव शहरसह जिल्ह्यात ३१ डिसेंबर ते ४ जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका राहू शकतो. किमान तापमान ९ ते १२ डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान २७ ते ३० डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे















Discussion about this post