जळगाव : राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे तसेच आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदामंत्री गिरीश महाजन या तिन्ही मंत्र्यांचे राजीनामे सरकारने तत्काळ घ्यावे. तसेच सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना नागरिकांना न्याय द्यावा; यासाठी आज तिन्ही नेत्यांच्या फोटोला चुना लावून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज अनोखे आंदोलन करण्यात आले. तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
ठाकरे गट जळगाव ग्रामीणकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले. जळगाव ग्रामीणचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, भाजप नेते प्रफुल्ल लोढा यांच्या फोटोला चुना लावून तीव्र निषेध करण्यात आला.
महाराष्ट्रात रोज ८ शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करत आहेत. असे असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानभवनात ऑनलाईन जंगली रमी खेळत आहेत. म्हणजे यांना शेतकरी विषयी ज्या समस्या आहेत. कर्जमाफी, हमीभाव, भाव फरक या गोष्टीचा विसर पडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तर एकीकडे राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायला पाहिजे, पण गृहराज्यमंत्री योगेश कदम त्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालवत असल्याचा प्रकारचा निषेध करण्यात आला.
दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांचे भाजपाचे नेते प्रफुल्ल लोढा याना हनी ट्रॅपमध्ये पॉक्सो अंतर्गत अटक झाली आहे. या सर्व कारणांमुळे कृषिमंत्री कोकाटे, गृहराज्यमंत्री कदम आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर यावेळी कार्यकर्त्यांनी तिन्ही नेत्यांच्या प्रतिमेला चुना लावत निषेध व्यक्त केला.
Discussion about this post