नवी दिल्ली : सध्या देशभरातील विविध भागात थंडीची लाट पसरली असून त्यात धुक्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले. यातच उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुरमधील अल्लाहगंजच्या फर्रुखाबाद मार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दाट धुक्यामुळे ट्रक आणि टेम्पोमध्ये झालेल्या जोरदार धडकेत 12 जण जागीच ठार झाले. ही घटना पाहणाऱ्यांच्या काळाजाचा थरकाप उडाला. अपघातात काहीजण गंभीररित्या जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलय.
मिळालेल्या माहितीनुसार, वेगात आलेल्या ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर टक्कर झाली. टेम्पोमध्ये असलेले बहुतांश प्रवासी आपल्या प्राणाला मुकले. अपघाताची माहिती मिळताच, पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवलं. सेहरा मऊच्या दक्षिणी भागात हा भीषण अपघात झाला.
पोलीस दाखल होण्याआधी त्या मार्गावरुन जाणारे वाहन चालक आणि प्रवाशांनी बचाव कार्य सुरु केलं. दुर्घटनेचे खूपच भयानक फोटो समोर आले आहेत. ट्रकच्या धडकेने टेम्पोचो तुकडे झाले. टेम्पोचे हे विखुरलेले भाग रस्त्यावर पडले होते. भीषण रस्ते अपघातानंतर पोलिसांसह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. जखमींच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला आवश्यक आदेश दिले आहेत.
Discussion about this post