बीड शहरातील स्वराज नगर भागात 18 वर्ष पगार मिळाला नाही म्हणून एका शिक्षकानं गळफास घेतल्याचे समोर आले. धनंजय नागरगोजे असे या शिक्षकाचे नाव आहे. ते कोळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेवर शिक्षक होते. आत्महत्येआधी धनंजय नागरगोजे यांनी काळीज पिळवटून टाकणारं पत्र लिहिलं, यात त्यांनी आपल्या मुलीची माफी मागितली. तसेच काही जणांची नावेही घेतली आहे.
काळजावर घाव घालणारी पोस्ट
मयत शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवरुन लिहिलेली पोस्ट काळजावर घाव घालणारी आहे. त्यात त्यांनी त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीला म्हटले “श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही” धनंजय नागरगोजे यांनी पोस्टमध्ये काही जणांची नावे घेतली. त्यात विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे यांची नावे आहेत. या सर्वांनी माझा खूप छळ केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मयत शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी पोस्टमध्ये म्हटले की, मला मारण्याचे कारण ही लोक आहे. मी त्यांना विचारले होत की, मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झाले काम करत आहे. अजून मला पगार नाही. आता पुढे काय करायचे? त्यावर विक्रम बप्पा म्हणाले, ‘तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा’ हे एकूण माझ्या पाया खालची जमीनच सरकली.
Discussion about this post