जळगाव/मुंबई । राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब होऊन उकाडा वाढला आहे. जळगावसह राज्यातील अनेक भागात फेब्रुवारीतच उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान सततच्या हवामान बदलामुळे नागरिकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागत आहे.
हवामान अंदाजानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे जमिनीवर एक ‘ट्रफ’ (कमी दाबाचा पट्टा) तयार होत आहे. यामुळे १७ आणि १८ फेब्रुवारीच्या सुमारास महाराष्ट्रातील पुणे विभागासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात.
जरी हा पाऊस मोठा नसला, तरी फेब्रुवारीतील हा बदल पिकांसाठी आणि वाढत्या तापमानासाठी महत्त्वाचा ठरेल.काल म्हणजेच गुरुवारी धुळे, परभणी आणि जेऊर येथे राज्यातील नीचांकी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगावचे किमान तापमान १४.५ तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या वर होते. उन्हाचा चटका वाढल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे.
आज (ता. १३) किमान तापमान स्थिर राहणार असून, कोकणात उष्ण व दमट हवामान, तर पुण्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.















Discussion about this post