मुंबई । राज्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला अशामध्ये येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून मुंबईसह कोकणात उष्ण लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सूर्य आग ओकू लागल्यामुळे उन्हाचे चटके वाढून तापदायक ठरत आहे. यातच उकाड्यात मोठी वाढ झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाही होत आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि कोकणात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तापमान कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
रविवार सकाळपर्यंतच्या २४ तासांत आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे देशातील उच्चांकी ३९.४ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात सोलापूर पाठोपाठ अकोला येथे सर्वात उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसंच, जेऊर, सांगली, सातारा, पुणे, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर येथे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. धुळे, जळगाव, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, वाशीम येथे तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअस पार गेला आहे. कमाल तापमानातील वाढीने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत.
आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्गात हवामान सरासरीपेक्षा उष्ण आणि दमट राहणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसंच, वाढते तापमान लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे.
Discussion about this post