मुंबई । राज्यातील अनेक ठिकाणी किमान तापमान वाढल्याने थंडीचा प्रभाव कमी झाला असून, उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज संपूर्ण राज्यात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी जळगावात किमान तापमान १५ अंशावर तर कमाल तापमान ३४ अंशापर्यंत होते.
फेब्रुवारीच्या सुरुवातीला राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पश्चिमी चक्रवातांचा प्रभाव कायम असून, वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १४५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय आहेत. उत्तर भारतातही थंडीचा जोर कमी-जास्त होत आहे. काल हरियाणातील नर्नूल येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी तापमान ४.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
राज्यात पहाटे धुक्याची दाट चादर पसरलेली असून, किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. काल निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील सर्वात कमी तापमान १२.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमान १३ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान कायम राहिले आहे, त्यामुळे हवामान काहीसे थंडसर जाणवत आहे.
दुपारच्या वेळी उन्हाचा तीव्र चटका आणि उकाडा जाणवत असून, नागरिक घामाघूम होत आहेत. काल सकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरी येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर जेऊर, सोलापूर, अकोला आणि ब्रह्मपुरी येथे पारा ३५ अंशांपार गेला. राज्यभर बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या वर राहिले आहे.
आज राज्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, महाराष्ट्राच्या पश्चिम भागात किमान तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र तापमान वाढीचा कल कायम राहील. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्यापासून राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post