मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या सरींमुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला होता मात्र आता अवकाळीचे सावट दूर झाले असून नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. राज्यभर उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून अनेक भागात उष्णतेची लाट जाणवत आहे.
महाराष्ट्र मध्ये कोकण आणि विदर्भ भागात उष्णतेची लाट आली असून, वाढत्या तापमानामुळे नागरिकांना प्रखर उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. घराबाहेर पडणेही कठीण होत असून, येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवार १२ एप्रिल रोजी राज्यातील हवामान उष्ण व कोरडे राहणार असून पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. पुढील ३ ते ४ दिवसांत तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोकण विभागात उष्ण व दमट हवामान कायम राहणार असून आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल. येथे किमान तापमान २४ ते २६ अंश तर कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात कोरडे व उष्ण वातावरण राहणार असून तापमान ३७ ते ४० अंशांपर्यंत पोहोचू शकते.
जळगावचा पारा देखील वाढला आहे. मागच्या दोन दिवसात जिल्ह्यातील पारा ५ अंशांनी वाढून थेट ४१ अंशावर पोहोचला आहे. यामुळे जळगावकर उष्णतेच्या तडाख्यात होरपळून निघत आहे दरम्यान, नागरिकांनी भर दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे वापरणे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.















Discussion about this post