जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका बसू लागला आहे. नेहमी एप्रिल महिन्यात जाणवणारी उष्णतेची तीव्रता यंदा मार्चमध्येच जाणवत आहे. दरम्यान आगामी दिवसात जळगावमध्ये तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज असून जळगावकरांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
५ मार्च रोजी जळगाव शहराचे तापमान ३८ अंशांवर पोहोचले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी पाच दिवस जिल्ह्यात हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. यामुळे तापमानात अधिक वाढ होऊन पुढील आठवड्यात पारा ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हे तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचू शकते. दरम्यान, एकीकडे तापमानाचा चटका बसत असताना मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाचीही शक्यता आहे. तापमान वाढल्यामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन बाष्प तयार होते, ज्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे जळगावकरांना एकाच महिन्यात ऊन आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागू शकतो.















Discussion about this post