धुळे । राज्यात पुन्हा एकदा तापमानात वाढ होऊ लागली असून अनेक ठिकाणी तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. सूर्य तापू लागल्याने उष्णतेच्या प्रचंड झळा बसू लागल्या आहे. दरम्यान, धुळ्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सिअस इतक्या उचांकी तापमानाची नोंद आज धुळ्यात करण्यात आली आहे. त्यानुसार जळगावमध्ये देखील तापमान ४० अंशापर्यंत पोहचले आहे.
मागील चार- पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली. धुळे जिल्ह्यात देखील दोन दिवस अधून मधून पडलेल्या अवकाळी पावसानंतर आता धुळ्याच्या तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तर आज उच्चांकी तापमानाची नोंद धुळे शहरात करण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास तीव्र झळा जाणवत असल्याने रस्त्यावर शुकशुकाट पाहण्यास मिळाला.
आणखी तापमान वाढीची शक्यता
धुळेकरांना प्रचंड वाढलेल्या उन्हाच्या झळा आता सोसाव्या लागत आहेत. तापमानाचा पारा प्रचंड वाढल्यामुळे धुळेकर नागरिक घराबाहेर न पडणे पसंत करत आहेत. यामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे. शिवाय आता यापुढे देखील तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
जळगावंही तापले
राज्यात सर्वाधिक तापमान असलेल्या जळगाव जिल्ह्यात सूर्य आग ओकू लागला आहे. आतापर्यंत ३५ ते ३७ अंशावर असलेले तापमान आज ४० अंशापर्यंत पोहचले आहे. यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असून अगदी सकाळी अकरा वाजेपासूनच अंगाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव जळगावकरांना अनुभवण्यास मिळाला.
Discussion about this post