नंदुरबार : नंदुरबार मधील तळोदा तालुक्यात बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची घटना नुकतीच घडली होती. यानंतर आता आज पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.शेतात मका घेण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय बालिकेवर हल्ला करत तिला शेतात फरफटत नेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दीपमाला नरसिंग तडवी (रा. सरदार नगर) असे घटनेत मृत झालेल्या मुलीचे नाव आहे.
सलगच्या होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेने तळोदा तालुका हादरला आहे. चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली दीपमाला ही आपल्या मैत्रिणीसोबत आज सकाळी रेवानगर येथील तिचे आजोबा शिवा धुर्या पाडवी यांच्या मक्याच्या शेतात मक्का घेण्यासाठी गेली होती. शेतात मका तोडण्यासाठी शेतात घुसली असतानाच बिबट्याने हल्ला चढविला.
शेतातून नेले फरफटत
शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दिपमाला हिच्यावर झडप घातली. तिला पकडून मक्याच्या शेतातून ५० मीटर अंतरावर फरफटत नेले. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बालिकेच्या मानेवर, कानाजवळ जबर जखमी करत तिला जागीच ठार केले. दीपमाला हिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण भयभीत झाली होती. यानंतर तिने घरी जाऊन घटना सांगितली. यानंतर ग्रामस्थ शेताच्या दिशेने धावत आले असता त्यांना दीपमाला हिचा मृतदेह आढळून आला.
बापाचा आक्रोश
चिमुकलीचा मृत्यूदेह पाहून बापाला अश्रू अनावर झाले होते. घटनास्थळी आलेल्या बापाने एकच आक्रोश केला. दरम्यान काल एका ४५ वर्षीय महिलेला बिबट्याने ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका निरागस बालिकेला बिबट्याने शिकार करत ठार केले. लागोपाठ नरभक्षक बिबट्याने दोन जीव घेतल्याने तळोदा तालुका हादरला आहे.
Discussion about this post