जळगाव : राज्यात ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या तलाठी भरती परीक्षा घेण्यात आली. यादरम्यान, वेळेआधी पेपर सोडविणाऱ्यांची चौकशी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली आहे. यात दोन तासांचा पेपर अवघ्या 30 ते 40 मिनिटांत अचूक सोडविणाऱ्याची कागदपत्रांची पडताळणी व चौकशी जिल्हाधिकार्यांनी केली असून जळगावात आढळलेल्या तीन संशयीतांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
महसूल तहसीलदार ज्योती छबूराव गुंजाळ (38, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार, गेठे राजेश रामभाऊ (44, असलम किराणाजवळ, अमरावती), भूषण रघुनाथ पाटील (30, गोताणे, ता.धुळे) व भागवत जर्नादन परिहार (33, अंजरवाडी, ता.चिखली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. संशयीतांनी तलाठी भरतीत गैरप्रकार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर करीत आहेत.
48 उमेदवारांवर संशय
तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन भागांत 57 सत्रांत राज्यात घेण्यात आली. राज्यभरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी 10 लाख 41 हजार 713 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. ही ऑनलाइन परीक्षा टीसीएस कंपनीने घेतली. प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती मात्र तलाठी भरती परीक्षेत अव्वल ठरलेल्या 48 उमेदवारांच्या यशावर शंका उपस्थित करण्यात आल्याने चौकशी करण्यात आली. परीक्षेत 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले होते. प्रभारी राज्य परीक्षा समन्वयकांनी परीक्षेदरम्यान या 48 उमेदवारांचे वर्तन संशयास्पद होते. पेपर अगदी वेगात सोडवून ते परीक्षा हॉलमध्ये बसून असल्याने चौकशी करण्यात आली व निष्कर्षाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला.
Discussion about this post