मुंबई । मुंबईत राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. ३० जून सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. आणि या अधिवेशानाच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे दिग्गज नेते नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन केले आहे. बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत असताना नाना पटोले आक्रमक झाले होते. नाना पटोले आक्रमक झाल्यानंतर ते अध्यक्षांकडे धावून गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. नाना पटोले यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत निलंबन केले आहे.
मोदी शेतकऱ्यांचे बाप आहेत, असे वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केले होते. त्याविरोधात नाना पटोले आणि विरोधक आक्रमक झाले होते. नाना पटोले यांचं अध्यक्षांनी निलंबन केल्यानंतर सभागृहात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतली. विधानसभेत एकच गदारोळ झाल्यानंतर थोड्यावेळासाठी कामकाज स्थिगत करण्यात आले. नाना पटोलेंच्या निलंबनाच्या विरोधात विरोधकांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. विधीमंडळाच्या आवारात विरोधकांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
Discussion about this post