मुंबई । लातूरमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकल्याच्या आरोपावरून छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण करण्यात आली. या मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात होती. आता अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या वर्तनावर झाली आहे.
अजित पवारांच्या ट्वीटमध्ये काय?
“काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.” असे अजित पवारांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.
सुनील तटकरेंकडून जाहीर नाराजी
लातूर येथील सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात निवेदन द्यायला आलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले. या घटनेनंतर संतप्त राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही सूरज चव्हाण यांच्या कृत्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर अजित पवार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत मोठी कारवाई केली आहे.
सूरज चव्हाण कोण?
दरम्यान सूरज चव्हाण हे अजित पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते. अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळा गट स्थापन केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्यासोबत आलेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांच्यावर ही कारवाई झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या निर्णयानंतर आता सूरज चव्हाण लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देतील असे सांगितले जात आहे.
Discussion about this post