मुंबई । गेल्या तीन महिन्यापूर्वी अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांच्यासह काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली होती. यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
निवडणूक आयोगासमोर सध्या राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुरू असून त्यामध्ये शरद पवार यांनीच भाजपसोबत जाण्यासाठी चर्चा केली होती.. असा आरोप अजित पवार गटाच्या नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटातील नेत्यांवर हल्लाबोल केला.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“शरद पवार यांना कधीही भाजपसोबत जायचे नव्हते. भाजपसोबत जायचे हे लक्षात आल्यामुळे त्यांनी नाराज होऊन राजीनामा दिला..” असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच यावेळी पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी “मला पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर होती. मी अध्यक्ष झाल्यानंतर भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय करणार होते असं ते म्हणत आहेत पण मला ते अशक्य होतं..” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या
Discussion about this post