मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काल 15 जुलै रोजी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीमागे तिसरी आघाडीचं प्रकरण असल्याची चर्चा सुरू असताना शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनीच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करताना शरद पवारांनाच अडकवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं.
काल छगन भुजबळांनंतर आज खासदार सुनेत्रा पवार पुण्यातील मोदी बाग येथे शरद पवार यांच्या भेटीला गेल्या आहेत. या भेटीमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. यावेळी निवासस्थानी सुप्रिया सुळेही असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काय बातचीत होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. मोदी बागेत शरद पवार यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार पोहोचल्या आहेत. ते बाहेर आल्यानंतर भेटीमागील नेमकं कारण कळू शकेल.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीतून निवडणुकी मैदानात होत्या. त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवणुकीत उतरल्या होत्या.या निवडणुकीत पवार कुटुंबियांमध्येच आरोप-प्रत्यारोप झाले होते. नणंद-भावजय यांच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. निवडणूक निकालात सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. या निवडणुकीनंतर प्रथमच सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी मंगळवारी गेल्या. त्यावेळी शरद पवार मोदीबागेतच होते. सुमारे तासभर सुनेत्रा पवार त्या ठिकाणी होत्या. परंतु त्यांनी कोणाची भेट घेतली? शरद पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली का? ही माहिती मिळाली नाही.
Discussion about this post