मुंबई । भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे देशातील विविध वस्तूंच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्याचा परिणाम सुकामेव्याच्या बाजारावरही जाणवत होता. अफगाणिस्तानातून आवक विस्कळीत झाल्याने गेल्या काही दिवसांत सुकामेवा १० ते २० टक्क्यांनी महागला आहे. प्रतिकिलो १०० ते ४०० रुपयांपर्यंत दरवाढ झाल्याचे दिसून येते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला. याचा थेट परिणाम उद्योग आणि व्यापारावर झाला. भारतात ६० ते ७० टक्के सुकामेवा अफगाणिस्तानातून पाकिस्तानमार्गे आयात होतो. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे अटारी-वाघा सीमेवरील व्यापार बंद झाला होता. परिणामी, पाकिस्तानमार्गे देणारे सुकामेव्याचे ट्रक अफगाणिस्तानातच अडकले. यामुळे स्थानिक बाजारपेठेत सुकामेव्याचे दर वाढले.
शिवाय, भारत-पाकिस्तान संबंध बिघडल्याने अफगाणिस्तानातील आयात दुबईमार्गे करावी लागली, ज्यामुळे वाहतूक खर्चातही वाढ झाली. दोन दिवसांपूर्वी भारताने अटारी-वाघा सीमा अफगाणिस्तान व्यापारासाठी पुन्हा खुली केली आहे. त्यामुळे दर कमी होण्याची शक्यता आहे.
भारतात दरवर्षी अफगाणिस्तानमधून सुमारे २० हजार टन सुकामेवा आयात होतो, ज्यात बदाम, काळे-हिरवे मनुके, जर्दाळू, अक्रोड आणि पिस्ता यांचा समावेश आहे. मात्र, गेल्या वर्षी या सर्वच सुकामेव्याच्या उत्पादनात घट झाली. याचाही दरवाढीवर परिणाम झाला आहे.
असे आहेत दर (प्रतिकिलो) –
काजू
जुने दर – ८४०, नवे दर – ९५० ते १०००
बदाम
जुने दर – ७६०, नवे दर – ८५० ते ९००
अंजीर
जुने दर – ७३०, नवे दर – ११५० ते १२००
मनुका
जुने दर – ४००, नवे दर – ४८० ते ५००
किसमिस
जुने दर – २५०, नवे दर – ३५०
अक्रोड
जुने दर – ८५०, नवे दर – ९५० ते १०००
जर्दाळू
जुने दर – ३००, नवे दर – ५५० ते ६००
Discussion about this post