जळगाव : जळगावातील रायसोनी इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूटच्या वसतिगृहात विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. विश्वंभर रत्नाकर खडके (वय २१) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो बीड येथून जळगावात शिक्षणासाठी आला होता. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
बीड येथील विश्वंभर रत्नाकर खडके हा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन विद्या शाखेच्या प्रथम वर्षाला होता. त्याचे गेल्या सत्रात दोन विषय राहिले होते. दरम्यान २६ फेब्रुवारीला महाविद्यालय संपल्यावर तो वसतिगृहातील वास्तव्यास असलेल्या खोली क्रमांक ४९ मध्ये गेला. त्याचे रूम पार्टनर आणि इतर मित्र नेहमीप्रमाणे सायंकाळी खोलीच्या बाहेर आले. यानंतर तो एकटाच होता.
खोलीतून सर्व गेल्यावर घेतला गळफास
खोलीत कोणीही नसताना विश्वंभर याने छताला दोरी बांधत गळफास लावत आत्महत्या केली. त्याच्या खोलीत सोबत राहणारा शिवमसिंह राजपूत हा खोलीत आला. यावेळी दार आतून बंद होते. त्याने धक्का मारून दार उघडले असता त्याला विश्वंभर छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हे पाहून घाबरलेल्याने आरडाओरड केला. यानंतर शेजारील खोल्यांतून इतर विद्यार्थी धावत तिथे पोचले. तत्काळ त्यांनी होस्टेल रेक्टर आणि महाविद्यालय प्रशासनाला माहिती दिली. एमआयडीसी (Police) पोलिस ठाण्याला माहिती मिळताच त्यांनी महाविद्यालयाच्या वसतिगृहात येऊन विश्वंभरचा मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला.















Discussion about this post