नंदुरबार : धुळे येथील महिलेने तिच्या तीन वर्षाचा चिमुकलीसह तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे घडलीय. दिपाली मधुकर मोरे (वय २८) आणि मुलगी टिना असं दोघींचे नाव असून याबाबत मयत महिलेच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यांनर पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे येथे वास्तव्यास असलेली दिपाली मधुकर मोरे (वय २८) या महिलेचे मधुकर नारायण मोरे यांच्याशी लग्न झाले होते. महिलेचे माहेर मध्य प्रदेशातील सेंधवा येथील आहे. दिपाली मोरे या महिलेचे नातेवाईक नंदुरबार येथे राहतात. तिच्या तीन वर्षीय चिमुकलीसह दसरा सण साजरा करण्यासाठी नंदुरबार येथे आली होती. दसरा झाल्यानंतर सेंधवा येथे माहेरी जाण्यासाठी दिपाली मोरे ही मध्य प्रदेश राज्यातील खाजगी गाडीने चिमुकलीसह निघाली. दरम्यान १४ ऑक्टोंबरला दुपारच्या सुमारास नंदुरबार तालुक्यातील कोरीट फाट्याजवळ तीन वर्षीय मुलीसह उतरली. त्याठिकाणी एका चहाच्या टपरीजवळ थोडावेळ थांबल्यानंतर दोन्ही मायलेकींनी पाणी पिवून हातातील पिशवी त्याठिकाणी ठेवून पुढे मार्गस्थ झाल्या.
सदर महिला चिमुकलीला घेवून प्रकाशा तापी नदीच्या पुलावर पोहचलेल्या. यानंतर दिपाली मधुकर मोरे हिने मुलगी टिना मोरे या चिमुकलीसह पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. कुणीतरी नदीत उडी घेत असल्याचे पाहून तेथून जाणाऱ्या बस चालकाने गाडी थांबवून त्या मायलेकींना वाचविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत महिलेने मुलीला घेवून नदीत उडी घेतली. मायलेकींना वाचवा वाचवा अशी आरोळी देताच पुलावर एकच गर्दी झाली होती. पोलिसांना मायलेकीचा मृतदेह गुजरात राज्याच्या हद्दीत आढळला होता.
दिपाली मधुकर मोरे हिचे धुळे येथील मधुकर मोरे यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर पती मधुकर मोरे व इतरांनी १२ फेब्रुवारी २०२० ते ऑक्टोंबर २०२४ दरम्यान दिपालीला शरीरावर पांढरे डाग (कोड) असल्याकारणाने शिवीगाळ करून मारहाण करीत होते. तसेच टोमणे मारून तिचा छळ करत होते. याच त्रासाला कंटाळून दिपाली मोरे हिने चिमुकलीसह प्रकाशा येथील पुलावरून तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना १४ ऑक्टोंबरला घडली. घटनेच्या नऊ दिवसांनी शहादा पोलीस ठाण्यात मयत महिलेची आई सुनंदा सुखदेव ढोले यांच्या फिर्यादीवरून पती मधुकर नारायण मोरे, सुशिलाबाई कैलास मोरे, उषाबाई सुनील मोरे, आशाबाई रवी मोरे, अनिल नारायण मोरे, सुनील नारायण मोरे या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेत.