जळगाव : सध्या राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू असताना जळगाव जिल्ह्यातील रावेरातील परीक्षा केंद्रावर घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली. रावेर येथील एका परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने तब्बल ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडले. मात्र, या कारवाईनंतर अवघ्या अडीच तासांत अहवालात कारवाई निरंक दाखवण्यात आली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मीनल करनवाल यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित केंद्र संचालकांकडे लेखी खुलासा मागितला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या जीवशास्त्र विषयाच्या परीक्षा वेळी रावेर मधील सरदार जी जी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी 11 विद्यार्थ्यांवर कॉफी करताना पकडलं. पथकाने या ११ जणांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पूर्ण करून तशी माहिती केंद्र संचालकांकडे सोपवली. नियमानुसार, ही माहिती तातडीने बोर्डाकडे जाणे अपेक्षित होते.
धक्कादायक बाब म्हणजे, भरारी पथकाच्या कारवाईनंतर अवघ्या अडीच तासांत नाशिक बोर्डाच्या वतीने जिल्ह्याचा सुधारित अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात जळगाव जिल्ह्यात एकही कॉपी केस झाली नसल्याचे (निरंक) नमूद करण्यात आले होते. भरारी पथकाने पकडलेले ते ११ विद्यार्थी आणि त्यांच्यावरील कारवाईची कागदपत्रे अडीच तासांत गायब झालीच कशी? असा संतप्त प्रश्न आता विचारला जात आहे. केंद्र संचालकांनी ही माहिती लपवली की बोर्डाच्या स्तरावर काही ‘अदृश्य’ हालचाली झाल्या, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सीईओ करनवाल ॲक्शन मोडमध्ये!
हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मीनल करनवाल यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. केंद्र संचालकांनी ही माहिती वरिष्ठांपर्यंत का पोहोचवली नाही आणि अहवालात ‘निरंक’ कशी दाखवली, याबाबत संबंधित केंद्र संचालकांकडे लेखी खुलासा मागवण्यात आला आहे. हा खुलासा समाधानकारक नसल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.















Discussion about this post