जळगाव । जळगाव शहरातील अॅड.सुशील अत्रे यांच्या घरावर काही तरुणांनी दगडफेक केल्याची घटना घडली असून यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी 10 ते 12 जणांना ताब्यात घेतल्याचे समजते. प्रतापनगर येथील श्री स्वामी समर्थ दिवशी केंद्राचे अतिक्रमण हटवण्यास विरोध करत तरुणांनी दगडफेक केल्याची माहिती आहे.
असे आहे प्रकरण
जळगाव शहरातील प्रताप नगर परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण असण्याच्या कारणावरून गेल्या अनेक वर्षांपासून तक्रार आहे. हे अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आल्याने ते काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यावरून काही जण संतप्त झाले त्यामुळे शुक्रवार, 18 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास मोठा जमाव प्रताप नगर परिसरातील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जमला व अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविण्यात आला.
त्यानंतर जमावाने धार्मिक स्थळापासून जवळच असलेल्या अॅड.सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथून 10 ते 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.