मुंबई । आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन टंचाई निर्माण झाल्याच्या चर्चा समाजमाध्यमांवर वेगाने पसरत असताना राज्य सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका मांडत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोल खरेदीवर २०० रुपयांची कोणतीही स्थायी किंवा सार्वत्रिक मर्यादा लागू केलेली नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, काही ठिकाणी अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी वाढत असल्याचे दिसून आल्याने स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी इंधनाचा अपव्यय व कृत्रिम टंचाई टाळण्यासाठी कडक नियमावली जारी केली आहे.
या आदेशानुसार, कोणत्याही पेट्रोल पंपावर बाटली, कॅन किंवा डब्यांमध्ये पेट्रोल व डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली असून इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच भरले जाणार आहे. तसेच, आपत्कालीन वाहनांना इंधन पुरवठ्यात प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाने इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगत नागरिकांनी विनाकारण इंधन साठवू नये, तसेच अफवांमुळे घाबरून अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.















Discussion about this post