जळगाव : जळगाव शहरात भरदिवसा बँकेत दरोडा टाकण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. शहरातील कालिका माता मंदिर परीसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दरोडा टाकून सुमारे 17 लाखांची रोकड तसेच लाखोंचे सोने लुटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडला आहे. या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरट्यांना पकडण्यासाठी जिल्हाभरात यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे.
शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असून आज गुरुवारी सकाळी नऊ वाजता बँक उघडताच नियमित कामात कर्मचारी गुंग असतानाच गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून बँकेत आले. कोयत्यासारखे धारदार शस्त्राने त्यांनी कर्मचार्यांना धमकावत आधी बँक व्यवस्थापकावर हल्ला चढवल्याने व्यवस्थापकांच्या मांडीला मोठी जखम झाली तर काही कळण्याआत दरोडेखोरांनी बँकेतील 12 ते 15 लाखांची रोकड बॅगेत भरून काही क्षणात पळ काढला.
गुरुवारी सकाळच्या वेळी फारशी ग्राहकांची वर्दळ नसल्याने चोरट्यांनी पाळत ठेवून दरोडा फत्ते केला. दरोड्याची माहिती कळताच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीचीचे प्रभारी शंकर शेळके आदींनी सहकार्यांनी भेट देत माहिती जाणली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. बँकेवरच दरोडा पडल्याने नागरीकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.