मुंबई । राज्यातील शाळा आज १५ जूनपासून सुरू होत असून यानिमित्ताने आज सर्वच ठिकाणी शाळांमध्ये मुलांचे स्वागत केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश शासनाकडून देण्यात येणार आहे. मे महीन्याच्या सुट्टीमुळे शांत असलेला शाळेचा परिसर आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने भरून जाणार आहे. शाळेच्या पटांगणामध्ये विद्यार्थांची लगबग आजपासून दिसणार आहे.
दरम्यानं, शालेय शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात शैक्षणिक पाडव्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर सजावट करण्यात आल्याचं अनेक ठिकाणी दिसत आहे. अनेक विद्यार्थी आज पहिल्यांदाच शाळेत जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी अन् पालक या दोघांच्याही मनात थोडीशी धाकधुक जाणवत आहे. मुलांचं स्वागत करताना चाफ्याचे फुल आणि साहित्याचे कीट यांचंही वाटप करण्यात येत आहे.
हा शैक्षणिक पाडवा सरकारचा स्टार्स उपक्रम आणि समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यामधील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये साजरा केला जाणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शाळांमध्ये केली गेली आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत रांगोळीच्या पायघड्या घालून होणार आहे. पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, खाऊ विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. शिक्षण विभागातील स्थानिक अधिकारी देखील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत उपस्थित राहणार आहेत.















Discussion about this post