जळगाव । १९९७ मध्ये नगरपालिका असताना कर्मचारी भरती करण्यात आली होती. त्यानंतर मात्र कोणतीही भरती झालेली नाही. मनपात कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असून त्याचा परिणाम दैनंदिन कामावरही होत आहे. दरम्यान, महापालिकेत सहा महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेत कर्मचारी कमी असल्याने नागरिकांची कामे करण्यास विलंब होत असल्यामुळे महासभेत कंत्राटी भरतीसाठी ठराव मंजूर करण्यात आला होता.महासभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार कंत्राटी भरती करण्यासाठी महापौर महाजन यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची भेट घेतली. आयुक्तांनीही सकारात्मकता दाखविली असल्याची माहिती महापौर महाजन यांनी दिली.
महापालिकेत कर्मचारी भरतीसाठी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आकृतिबंध तयार करून शासनाला पाठविला होता. त्याला शासनाने मंजुरीही दिली आहे. मात्र, कर्मचारी भरतीसाठी नियमवाली शासनाकडून प्राप्त झालेली नाही. त्याची अद्याप प्रतीक्षा आहे. त्यामुळे कंत्राटी भरतीसाठी ठराव मंजूर करण्यात आला होता.
सौ. महाजन यांनी सांगितले, की सहा महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरतीची प्रक्रिया आयुक्त लवकरच सुरू करणार आहेत. प्रत्येक विभागातून पदांची संख्या मागवून आवश्यकतेनुसार कर्मचारी भरती करण्यात येईल. याबाबत आयुक्तांनी प्रत्येक विभागाकडून माहिती मागविली असल्याचेही महापौर महाजन यांनी सांगितले.
Discussion about this post