मुंबई । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या आधीच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार खात्यावर जमा होणार आहे.सरकारने त्यासाठी लागणारी रक्कम महामंडळाकडे वर्ग केलीय. शासनाने कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर महिन्याचे सवलतमूल्य ३५०.०० कोटी रुपये महामंडळाला प्रदान करण्यात आलीय.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा दरमहिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान होतो. मात्र त्यापूर्वी येणाऱ्या दिवाळीत आर्थिक खर्च, सणांसाठीची खरेदी कशी करायची असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांसमोर आहे. कर्मचाऱ्यांची ही समस्या आता शासनाच्या या निर्णयाने दूर होणार आहे. एसटी महामंडळाने दिवाळीआधीच पगार देण्याचा निर्णय घेतलाय.
२८ ऑक्टोबरला वसूबारस ते रविवारी ३ नोव्हेंबरला भाऊबीज यादरम्यान दिवाळी सण साजरा होणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा पगार ७ नोव्हेंबर रोजी अपेक्षित आहे. मात्र दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा करण्याचा महामंडळाचा मानस आहे.