मुंबई । नुकतीच पंढरपुरमध्ये आषाढी वारी मोठ्या उत्साहात पार पडली. लाडक्या विठूरायचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर बाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक भक्त पंढपूरमध्ये आले होते. यातच आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बस सोडण्यात आल्या होत्या.
दरम्यान एसटी महामंडळाला यामुळे मोठा नफा झाल्याचं समोर आलं आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
विठ्ठलाच्या सेवेमुळे एसटी महामंडळाला तब्बल ३५ कोटी ८७ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ९ लाख ७१ हजार भाविकांनी एसटीने प्रवास केला. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, संभाजीनगरसह राज्यातील प्रत्येक एसटी विभागातून वारीसाठी स्पेशल एसटी बसेसची सोय करण्यात आली होती, तसेच वारीसाठी ५२०० जादा बसेस पंढरपूरसाठी पाठवण्यात आल्या होत्या, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक -प्रवाशी येत असतात. या भाविक- प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीच्या माध्यमातून सुरक्षित प्रवास मिळाला. यातून एसटी महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. जे मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा ६ कोटी ९६ लाख ३ हजार रुपयांनी जास्त आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली आहे.
Discussion about this post