महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा ठरवण्यात आल्या आहेत. येत्या १५ दिवसांत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे
मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारीपासून होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये सध्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा सुरू आहे. विद्यार्थी या महिन्याच्या सुरूवातीपासूनच अंतिम परीक्षेच्या तारखा काय असणार या विचारात आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ वीची परीक्षा ११ फ्रेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २१ फ्रेब्रुवारीपासून सुरू होऊ शकते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. असे असले तरी बोर्डाकडून मात्र अद्यापही या बाबात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एकूण ९ विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जाते. यात मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागात परीक्षा होणार आहेत.
दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागतील अशी शक्यता आहे. तसेच रेग्युलरमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा लगेचच जुलै आणि ऑगस्टमध्ये घेतली जाते.