सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन म्हणजेच SSC CGL साठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या वर्षी या भरती प्रक्रियेद्वारे 14,582 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरतीची अधिकृत अधिसूनचा देखील जारी करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी ssc.gov.in वर सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2025 आहे.
कोणत्या पदांवर होणार भरती?
केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदांवर भरती केली जाईल. गट ‘ब’ पदांमध्ये सहाय्यक विभाग अधिकारी, प्राप्तिकर निरीक्षक, केंद्रीय उत्पादन शुल्क निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, पोस्टल निरीक्षक, नार्कोटिक्स निरीक्षक, कार्यकारी सहाय्यक, संशोधन सहाय्यक, विभागीय लेखापाल, एनआयए उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, सांख्यिकी अन्वेषक (ग्रेड-II) या पदांचा समावेश आहे. तसेच गट ‘क’ पदांमध्ये लेखापाल, पोस्टल सहाय्यक, अप्पर विभागीय लिपिक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, कर सहाय्यक या पदांचा समावेश असेल.
शैक्षणिक पात्रता- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी आणि सांख्यिकी अन्वेषक (ग्रेड-II) वगळता सर्व पदांसाठी अर्जदारांकडे कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. तर, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी आणि १२ वी मध्ये गणितात किमान ६० टक्के गुण. याशिवाय, सांख्यिकी अन्वेषक (ग्रेड-II) साठी अर्थशास्त्र, सांख्यिकी किंवा गणितात पदवी (अनिवार्य) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पर्यायी पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा- काही पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे, काहींसाठी १८ ते ३० वर्षे, काहींसाठी १८ ते ३२ वर्षे आणि काहींसाठी २० ते ३० वर्षे आहे. OBC, SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेतही सूट दिली जाईल.
अर्ज कसा भरायचा?
सर्वप्रथम SSC ssc.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर पोर्टलवर लॉग इन करा आणि SSC CGL 2025 परीक्षेसाठी अर्ज करा.
आता सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
फॉर्म सेव्ह करुन डाउनलोड करा.
कन्फर्मेशन पेजची प्रिंटआउट घ्या.
Discussion about this post