उन्हाळी सुट्यांमध्ये उत्तर आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा विचार करून मध्य रेल्वेने विविध मार्गांवर धावणाऱ्या विशेष साप्ताहिक रेल्वे गाड्यांचा सेवा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
या गाड्या आणखी अडीच ते तीन महिने सुरू राहणार आहेत. पुणे रेल्वे विभागातील दौंड-अजमेर (०९९२६) आणि सोलापूर-अजमेर (०९६२८) या साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन सुरुवातीला २७ मार्च २०२५ पर्यंत करण्यात आले होते. मात्र, वाढत्या मागणीनुसार या दोन्ही रेल्वेगाड्यांचा कालावधी २६ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, अजमेर ते सोलापूर (०९६२७) विशेष रेल्वे ९ एप्रिलपासून २५ जूनपर्यंत धावणार होती, मात्र आता ती २६ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच, शिर्डी ते बीकानेर (०४७१६) साप्ताहिक विशेष रेल्वे सुरुवातीला ३० मार्च २०२५ पर्यंत चालविण्याचा निर्णय झाला होता, पण प्रवाशांची वाढती गर्दी पाहता २९ जून २०२५ पर्यंत सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, दादर-भुसावळ (०९०५१) विशेष रेल्वे आठवड्यातून तीन वेळा धावत होती आणि तिची सेवा ३१ मार्चपर्यंत नियोजित होती. आता या रेल्वेचा कालावधी वाढवून ३० जून २०२५ पर्यंत चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे उन्हाळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार असून, गर्दीच्या दिवसांत प्रवास अधिक सुलभ होईल.
Discussion about this post