जळगाव: गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील विविध पोलीस विभागांतील लाचखोरी व हप्ता वसुलीची प्रकरणे समोर आली असून अशातच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) दोन कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आलीय तर एका पोलीस उपनिरीक्षकाला ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीशी संपर्क साधल्याप्रकरणी नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे.
लाचखोरीची सुरुवात वाहतूक शाखेपासून झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ट्रक चालकांकडून पैसे वसूल करतानाचा वाहतूक पोलीस संदर्भातील हा व्हिडीओ होता. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनमधील काही कर्मचाऱ्यांवर लाच घेतल्याच्या आरोपांनंतर कारवाई करण्यात आली. आता स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी गजानन देशमुख आणि संघपाल तायडे यांनी गुटखा आणि पेट्रोल विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून हप्ता घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना प्राप्त झाल्यानंतर या दोघांची बदली अनुक्रमे पाचोरा आणि फत्तेपूर येथे करण्यात आली आहे.
याशिवाय, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांनी ड्रग्ज प्रकरणात फरार असलेल्या अरबाज नावाच्या आरोपीशी तब्बल 352 वेळा मोबाईलद्वारे संपर्क साधल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या गंभीर प्रकरणानंतर त्यांना तात्काळ नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे.
या सर्व कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलातील भ्रष्टाचारी प्रवृत्तींना चाप बसण्याची शक्यता आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. यापुढे अशा प्रकारच्या प्रकरणांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिला आहे.
Discussion about this post